मुंबई – ही फक्त स्वप्नांची नगरी नाही, तर असंख्य कष्टकऱ्यांच्या घामाने घडवलेली भूमी आहे. या शहराच्या उभारणीत गिरणी कामगारांचा वाटा काय आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या हक्कांसाठी रक्त सांडलेल्या त्या गिरणी कामगारांचे स्वप्न काय होते? स्वतःच्या घामाने उभारलेल्या मुंबईत एक छोटंसं घर आणि मुलाबाळांसाठी सुरक्षित भविष्य! पण आजच्या तारखेला त्या कष्टकऱ्यांच्या वारसांना आपला हक्क मागण्यासाठी अजूनही रस्त्यावर उतरावं लागत आहे.
गिरण्यांचे भोंगे बंद झाले, पण त्या आवाजासोबत हजारो घरांतील चुलीही थंड झाल्या. एकेकाळी या गिरण्यांमध्ये गजबजणाऱ्या हातांना अचानक थांबावं लागलं, आणि भांडवलदारांनी या जमिनींवर मॉल, टॉवर्स आणि आलिशान इमारती उभारायला सुरुवात केली. ज्यांनी ही जमीन घडवली, ज्यांनी ती जागा आपल्या घामाने सींचली, त्यांनाच आज बाहेर हुसकावलं जात आहे.
सरकारने वेळोवेळी गिरणी कामगारांसाठी योजना जाहीर केल्या, अर्ज करण्यासाठी संधी दिल्या, पण प्रत्यक्षात त्याचा लाभ किती जणांना मिळाला? हजारो गिरणी कामगार आजही मुंबईच्या उपनगरांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये किंवा लांबच्या खेड्यांमध्ये हलाखीत जगत आहेत. काहींना अर्ज प्रक्रियेची माहिती मिळाली नाही, काहींना गरजेची कागदपत्रे वेळेत मिळाली नाहीत, तर काहींना प्रशासनाने अडवून ठेवलं. ही फक्त निष्काळजीपणा म्हणून सोडून देता येईल का? नाही! हा एका संपूर्ण वर्गावर झालेला अन्याय आहे, ही एक पद्धतशीर पिळवणूक आहे.
गिरणी कामगारांच्या हक्काच्या जमिनीवर मोठमोठे गगनचुंबी प्रकल्प उभे राहिले, भांडवलदारांनी कोट्यवधी कमावले, पण त्या जागेचा खरा मालक कोण? गिरणी कामगार आणि त्यांचे वारस! जर सरकारला ठरवलं, तर एका आदेशाने या सर्व कामगार व वारसांना त्यांच्या हक्काचा अधिकार मिळू शकतो. पण प्रश्न असा आहे – सरकारला खरंच ते द्यायचं आहे का?
आजही गिरणी कामगारांचा लढा सुरू आहे. न्याय मिळेल का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, पण जर हा लढा अखेरपर्यंत चालू राहिला, तर न्याय मिळाल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही! कारण हा लढा फक्त घरांसाठी नाही, तो अस्तित्वासाठी आहे, अस्मितेसाठी आहे, न्यायासाठी आहे!
एकजूट राहा, संघर्ष करा, न्याय मिळवूच!
संपर्क प्रमुख हरिश्चंद्र करगळ ( हरिभाऊ)
7738591262./9175378199.