Home » LATEST NEWS » गिरणी कामगारांच्या घराच्या हक्कासाठी निर्णायक लाँगमार्च — ०९ जुलै रोजी मुंबईत ऐतिहासिक मोर्चा

गिरणी कामगारांच्या घराच्या हक्कासाठी निर्णायक लाँगमार्च — ०९ जुलै रोजी मुंबईत ऐतिहासिक मोर्चा

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराच्या हक्काच्या लढ्याला आता निर्णायक वळण मिळाले असून, राज्यातील १४ गिरणी कामगार संघटना एकत्र येऊन ‘गिरणी कामगार संयुक्त लढा समिति’ची स्थापना करण्यात आली आहे. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर ०९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भायखळा राणीबाग येथून आझाद मैदानापर्यंत मोठा लाँगमार्च मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाचे औपचारिक घोषणापत्र २७ जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. या परिषदेत समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी मोर्चाची माहिती देताना सांगितले की, “गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घराच्या प्रश्नावर आता अंतिम आणि निर्णायक लढा दिला जाणार असून, तो जिंकायचाच आहे.”

सध्या सरकारकडून शेलू, वांगणी यांसारख्या मुंबईबाहेरील ठिकाणी पुनर्वसनाचा पर्याय देण्यात येत आहे, परंतु त्याला बहुतांश कामगारांचा तीव्र विरोध आहे. गिरणी कामगारांनी मुंबईसाठी आपले आयुष्य घालवले आणि त्यांना घर देताना त्याच मुंबईबाहेर ढकलले जात आहे, ही परिस्थिती धक्कादायक असल्याचे मत अनेक संघटनांनी व्यक्त केले आहे.

त्याचवेळी, ही घरे नाकारणाऱ्या कामगारांचा हक्कही डावलला जात असून, अनेक वंचित कामगार व त्यांचे वारस अजूनही अर्ज करु शकलेले नाहीत किंवा यादीतून वगळले गेले आहेत. त्यामुळे या लढ्यात आता वंचित कामगारांचा मुद्दा आणि १९८१ च्या संपातील आठ गिरण्यांच्या कामगारांचा समावेश यांसारखे मुद्देही केंद्रस्थानी आहेत.

१५ मार्च २०२४ चा शासन निर्णय कामगारांच्या विरोधात असल्यामुळे तो त्वरीत रद्द/बदल करून मुंबईतच सर्व पात्र कामगारांचे मोफत पुनर्वसन करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे, कालबद्ध आराखडा तयार करून ‘इरादा पत्र’ वाटपाची मागणी, आणि कामगारांना वेळेत घरे न मिळाल्यास सरकारने नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी भूमिका काही संघटनांनी मांडली.

या लढ्याला केवळ गिरणी कामगार नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांची, समाजाच्या सर्व थरातील लोकप्रतिनिधींची, सामाजिक कार्यकर्त्यांची आणि महाराष्ट्रातील जनतेची मोठी ताकद लाभली पाहिजे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबईच्या वैभवामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या गिरणी कामगारांना आजही त्यांच्या हक्काच्या घरासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे सरकारसाठी लज्जास्पद आहे. त्यामुळे या मोर्चात हजारोंच्या संख्येने कामगार, वारस आणि सहानुभूतीशील नागरिकांनी सहभागी व्हावे, ही वेळेची गरज असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

“नको वांगणी, नको शेलू – हवे मुंबईतच घर!” ही घोषणा आज गिरणी कामगारांच्या हृदयातून उठते आहे आणि ०९ जुलैचा मोर्चा ही मागणी सरकारच्या दारात ठणकावून पोहोचवेल, असा विश्वास या लढ्यात सामील सर्व संघटनांनी व्यक्त केला आहे.

#गिरणीकामगार, #गिरणीकामगारांचा_लढा, #गिरणीकामगार_मोर्चा, #मुंबईतच_घर_हवे, #महाराष्ट्रशासन, #कामगारसंघटना, #१४संघटना, #गिरणीकामगार_संयुक्त_लढा, #मोर्चा_९जुलै, #कामगारन्याय, #मुंबई_मोर्चा, #गिरणीकामगारआंदोलन, #घराचा_हक्क, #NTCजमीन, #घर_मिळालंच_पाहिजे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *