नाशिक शहरातील संत कबीर नगर परिसरात शनिवारी (८ मार्च) रात्री ११ वाजता अरुण बंडी या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अरुण बंडी याचे काही युवकांसोबत पूर्वीपासून वाद होते. शनिवारी रात्री चार जणांच्या टोळक्याने त्याला अडवून धारदार शस्त्राने हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि दंगा पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. मारेकरी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.