नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा आरोप नाशिकचे विनायक पांडे यांनी केला आहे. त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावर आरोप करत सांगितले की, त्या पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाहीत आणि त्यांनी माझ्याकडूनही पैसे घेतले आहेत. या धक्कादायक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विनायक पांडे यांनी माध्यमांसमोर हा आरोप करत सांगितले की, “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या जबाबदार व्यक्तीकडून पैशाची मागणी होणे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे. माझ्यासह अनेक नागरिकांकडून त्यांनी पैसे घेतल्याची माहिती समोर येत आहे.” यामुळे आता निलम गोऱ्हे यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. या आरोपांवर निलम गोऱ्हे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांत या आरोपांची सत्यता काय आणि निलम गोऱ्हे यांची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
