मुंबई, ६ मार्च: गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली आहे.
“गिरणी कामगारांनी संपूर्ण मुंबई उभारली, मात्र आज त्यांनाच हक्काची घरे मिळत नाहीत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांत घरे दिली जातात. त्याच धर्तीवर गिरणी कामगारांनाही परवडणाऱ्या दरात घरे मिळाली पाहिजेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी सरकारवर दबाव
आझाद मैदानात सुरू असलेल्या गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सुनील प्रभू यांनी सरकारला इशारा दिला की, “कामगारांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल.”
यासोबतच, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गिरणी कामगार संघटनांसोबत तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे.
आंदोलनाला अधिक बळ मिळण्याची शक्यता
गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी आमदार सुनील प्रभू यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या विषयावर सरकारवरील दबाव वाढला आहे. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही, तर हा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.