Home » महाराष्ट्र » गिरणी कामगार मंत्रालयावर धडकणार – ६ मार्चला भव्य मोर्चा

गिरणी कामगार मंत्रालयावर धडकणार – ६ मार्चला भव्य मोर्चा

मुंबई, दि. २३ फेब्रुवारी: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या हक्कांसाठी ६ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान, मुंबई येथून मंत्रालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गिरणी कामगार एकजूट संघटनेच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या ऐतिहासिक लढ्यात सर्व श्रमिक संघटना, संयुक्त मराठी मुंबई चळवळ, गिरणी कामगार सेना, मुंबई गिरणी कामगार युनियन (आयटक), N.T C.S.C./S.T. असोसिएशन, हेमन् धागा जनकल्याण फाऊंडेशन आणि गिरणी कामगार सभा या संघटना एकत्र येऊन सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात आवाज उठवणार आहेत. अनेक वर्षांपासून सरकार उद्योगपतींना विशेष सवलती देत असताना, मेहनतीने आपले आयुष्य गिरण्यांमध्ये घालवलेल्या कामगारांना मात्र मुंबईबाहेर शेळु, वांगणी यांसारख्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा अन्यायकारक निर्णय लादला जात आहे. हा अन्याय सहन न करता, गिरणी कामगार आपल्या न्याय्य हक्कांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. हा लढा अधिक प्रभावी होण्यासाठी सर्व श्रमिक संघटनेने ग्रामीण भागांत जागृतीसाठी संवाद मेळावे घेतले आहेत, तर मुंबईत संयुक्त मराठी मुंबई चळवळ विविध भागांत संपर्क अभियान राबवत आहे. कामगारांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे अध्यक्ष विवेकानंद बेलूसे यांनी सांगितले की, “सरकारने नेहमीच उद्योगपतींच्या बाजूने भूमिका घेतली आहे, मात्र गिरणी कामगारांनी आपल्या हक्कांसाठी आता निर्णायक लढा द्यायला हवा. ६ मार्च रोजी मंत्रालयावर लाखोंच्या संख्येने एकजूट दाखवून हा अन्याय थांबवायचा आहे.” सरकारने हा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि उर्वरित गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना अर्ज करण्याची नव्याने संधी देऊन त्यांचे पुनर्वसन मुंबईतच मोफत करावे, अशी ठाम मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे. या लढ्यात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क प्रमुख हरीचंद्र करगळ (मो. ९१७५३७८१९९) यांच्याशी संपर्क साधावा. ६ मार्च रोजी मंत्रालयावर भव्य एल्गार पुकारला जाणार आहे.

One Comment

  1. All Girni kamgar la mofath ghar diya ve 500 sqft Mumbai madhe pahe je kami darath pl co operate to all Girni kamgar and get their home soon as possible to each and every Girni kamgar and their varis nominee

    Thanks you

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *