मुंबई, दि. २८ फेब्रुवारी २०२५ – गिरणी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी निर्णायक लढ्याची तयारी सुरू झाली आहे. ६ मार्च २०२५ रोजी आझाद मैदान, मुंबई येथून मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार गिरणी कामगार एकजूट संघटनेने केला आहे. या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी दादर येथील सर्व श्रमिक संघटनेच्या कार्यालयात विशेष निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते, या ऐतिहासिक लढ्याच्या तयारीसाठी गिरणी कामगार एकजूटमध्ये सहभागी असलेल्या सात संघटनांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. विशेषतः सर्व श्रमिक संघटनेने गावोगावी जाऊन सभा घेतल्या असून, गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या मोर्चामध्ये सर्व श्रमिक संघटना, संयुक्त मराठी मुंबई चळवळ, गिरणी कामगार सेना, मुंबई गिरणी कामगार युनियन (आयटक), N.T C.S.C./S.T. असोसिएशन, हेमन् धागा जनकल्याण फाऊंडेशन आणि गिरणी कामगार सभा यांचा सक्रिय सहभाग आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गिरणी कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार उद्योगपतींना विशेष सवलती देत असताना, मेहनतीने आयुष्य गिरण्यांमध्ये घालवलेल्या कामगारांना मात्र मुंबईबाहेर शेळु, वांगणी यांसारख्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा अन्यायकारक निर्णय लादला जात आहे. गिरणी कामगारांसाठी हा निर्णय म्हणजे त्यांच्यावर अन्याय असून, हा अन्याय सहन न करता कामगार पुन्हा एकदा आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
६ मार्चचा मोर्चा हा केवळ एक निदर्शने नसून, गिरणी कामगारांच्या भवितव्याचा निर्णायक लढा आहे. सरकारने त्वरित हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा आणि गिरणी कामगारांचे पुनर्वसन मुंबईतच करावे, अशी संघटनांची ठाम मागणी आहे. कामगारांनी एकजूट दाखवून सरकारला जाग आणण्याची हीच वेळ आहे, आम्ही एकजुट म्हणून या लढ्यासाठी पूर्णपणे तयार आहोत असे मत सर्व श्रमिक संघटनेचे नेते संतोष मोर यांनी व्यक्त केले.