मुंबई | प्रतिनिधी
गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर चर्चा करताना, संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने एक स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस व गिरणी कामगारांच्या हक्कांचे सातत्याने प्रतिनिधित्व करणारे मा.श्री.गोविंद मोहिते, तसेच संघाचे वरिष्ठ नेते श्री. निवृत्ती देसाई व श्री. आप्पा शिरसेकर यांच्या समवेत नुकतीच यासंदर्भात सखोल चर्चा झाली.
या चर्चेमध्ये, “मुंबईतच गिरणी कामगारांना घरे देणे शक्य असताना, त्यांना मुंबईबाहेर ढकलण्याचा प्रयत्न का?” असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच, अद्याप घरापासून वंचित असलेल्या गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना नव्या अर्जासाठी एक विशेष संधी देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
या संदर्भात, गिरणी कामगारांसाठी स्वतंत्र आणि विशेष धोरणात्मक निर्णय घेऊन शासनाने त्यांच्या घरांच्या प्रश्नावर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी पुढे आली. या उद्देशाने, लवकरच सर्व संघटना, युनियन व सामाजिक संस्था यांची संयुक्त बैठक घेऊन पुढील भूमिका निश्चित करण्यात यावी, अशी स्पष्ट व ठाम भूमिका संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे अध्यक्ष श्री. विवेकानंद बेलूसे यांनी मांडली.
या चर्चेला मा. श्री.गोविंद मोहिते यांचा सकारात्मक आणि प्रेरणादायी प्रतिसाद लाभला.या पार्श्वभूमीवर त्यांनी या चर्चेत सांगितले की, “गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी आता सर्व संघटनांनी एकत्र येऊन भव्य व निर्णायक लढा उभारावा लागेल. यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन.” त्यांच्या या भूमिकेचा व प्रेरणादायी सहकार्याचा संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. येणाऱ्या अधिवेशनात गिरणी कामगारांच्या प्रश्नावर निर्णायक लढा उभा करण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहनही मा. श्री. गोविंद मोहिते यांनी केले.
या चर्चेस चळवळीचे अध्यक्ष श्री. विवेकानंद बेलूसे, उपाध्यक्ष श्री. ताम्हणकर, श्री. बनकर आणि रमाकांत बने हेही उपस्थित होते. लवकरच निश्चित तारीख जाहीर करून संयुक्त बैठकीची रूपरेषा जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळाली.
2 Comments
अगदी बरोबर आहे
Agadi barobar aahe