मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी घर मिळवणे हे स्वप्नच आहे. याच स्वप्नाचा गैरफायदा घेत काही लोक घर मिळवून देण्याच्या अमिषाने लोकांना लाखोंनी गंडवत आहेत. विशेषतः मील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांना स्वस्तात म्हाडाची घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
फसवणुकीची पद्धत
ही टोळी मुख्यतः काळाचौकी, प्रभादेवी, घोडपदेव या भागात सक्रिय असून मील कामगार आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात घर मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देते. हे लोक बनावट दस्तऐवज, खोटी कागदपत्रे आणि नकली ओळखीचा वापर करून आपल्या विश्वासात घेतात.
-
सुरुवातीला घर मिळवून देण्यासाठी कमी रकमेची मागणी करतात.
-
नंतर प्रोसेससाठी विविध कारणे सांगून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळतात.
-
बनावट पेपर्स दाखवून सरकारी योजनांमध्ये नाव असल्याचा बनाव करतात.
-
शेवटी पैसे घेतल्यानंतर संपर्क बंद करून गायब होतात.
अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल
या प्रकरणात मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल आहेत. विशेषतः काळाचौकी, सायन, माटुंगा, भोईवाडा, दादर, भायखळा आणि पायधुनी पोलीस ठाण्यांमध्ये अशा फसवणुकीच्या अनेक तक्रारी आहेत. फसवणूक झालेल्या नागरिकांनी न्याय मिळवण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले असून न्यायालयांमध्ये त्यांच्याविरोधात केस सुरू आहेत. मात्र, या टोळीतील गुन्हेगार वारंवार जामिनावर सुटून पुन्हा लोकांची फसवणूक करत आहेत.
कोटींचा घोटाळा – गरीबांचे अश्रू कोण पुसणार?
या टोळीने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. अनेक गरीब कुटुंबांनी घर मिळवण्याच्या आशेने आयुष्यभराची पुंजी या भामट्यांच्या हवाली केली, पण आज ती पुंजीही गेली आणि घराचे स्वप्नही भंगलं. काही जण तर कर्जबाजारी झाले, तर काहींची मानसिक स्थिती खालावली आहे.
सावध रहा, सतर्क रहा!
सर्व नागरिकांना आवाहन – अशा खोट्या आश्वासनांना बळी पडू नका.
-
कोणीही स्वस्तात किंवा लवकर घर मिळवून देतो असे सांगत असेल, तर प्रथम अधिकृत सरकारी कार्यालयात खातरजमा करा.
-
कोणत्याही संशयास्पद व्यक्तीला पैसे देऊ नका.
-
जर कोणी अशाप्रकारे फसवणूक करत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा.
-
सोशल मीडियावर आणि मित्रमंडळीत याबाबत जागरूकता पसरवा, जेणेकरून इतर लोकही अशा फसवणुकीपासून वाचू शकतील.




