मुंबई, ६ मार्च: गिरणी कामगार एकजूटच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदानात मोठे आंदोलन झाले. गिरणीच्या जागेवर कामगारांना हक्काची घरे मिळालीच पाहिजेत आणि १५ मार्च २०२४ चा अन्यायकारक जीआर तात्काळ रद्द झाला पाहिजे, अशी ठाम मागणी या आंदोलनात करण्यात आली. सरकारला थेट इशारा देताना गिरणी कामगारांनी मंत्र्यांच्या आणि सत्ताधारी आमदारांच्या कार्यालयांना घेराव घालण्याचा निर्धार व्यक्त केला.
गिरणी कामगार एकजूटचे नेते कॉम्रेड उदय भट यांनी घोषणा केली की, “जर अर्थसंकल्पीय अधिवेशनात गिरणी कामगारांच्या प्रश्नावर ठोस निर्णय झाला नाही, तर महाराष्ट्रभर आंदोलन उभे राहील आणि प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांच्या कार्यालयाला बेमुदत घेराव घातला जाईल!”
आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गिरणी कामगार व वारस यांचा पाठिंबा मिळाला असून सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.