मुंबई : सर्व श्रमिक संघटनेचे नेते कॉम्रेड उदय भट आणि संघटनेचे इतर कार्यकर्ते यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे येथील गिरणी कामगार वारसदारांना एकत्र करण्यासाठी ग्रामीण भागाचा दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान, ग्रामीण भागातील गिरणी कामगार वारसदारांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे.
गिरणी कामगार वारसदारांसाठी मुंबईत घरे मिळवून देण्यासाठी हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने सेलू-वांगणी येथे लादण्याचा प्रयत्न केलेल्या घरांसंदर्भात योग्य उत्तर मिळावे, यासाठी 6 मार्च 2025 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईतील गिरणी कामगार वारसदारांनीही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. या लढ्यासाठी एकजूट दाखवणे गरजेचे असून, मोठ्या प्रमाणात उपस्थिती हा यशाचा महत्त्वाचा घटक ठरेल, असे कॉम्रेड उदय भट यांनी स्पष्ट केले आहे.