सातारा ,०७ एप्रिल २०२५ — पुण्यानंतर आता साताऱ्यातही शिवधर्म फाउंडेशनने जोरदार मोर्चा काढत संभाजी ब्रिगेडला थेट इशारा दिला आहे. “संभाजी नव्हे, छत्रपती संभाजी महाराज” असा नारा देत, शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या संघटनेच्या नावातील एकेरी उल्लेखाचा तीव्र निषेध केला आहे.
आज सायंकाळी साताऱ्यातील शिवतीर्थ येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभाग घेतला. फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकआण्णा काटे यांनी मोर्चाच्या वेळी भाषण करताना म्हटले की, “संभाजी ब्रिगेडने आपल्या नावात छत्रपती संभाजी महाराज यांचा योग्य प्रकारे उल्लेख करावा. जर संघटनेने नावात त्वरित बदल केला नाही, तर महाराष्ट्रभर आंदोलन छेडले जाईल.”
यापूर्वी ०३ एप्रिल रोजी पुण्यातही याच मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. साताऱ्यातील यशस्वी आंदोलनानंतर आता शिवधर्म फाउंडेशनने इशारा दिला आहे की, प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन उभे राहणार असून, याचे सर्वस्वी उत्तरदायित्व महाराष्ट्र शासनावर असेल.
“आमच्या दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आवश्यक असल्यास शाहिद व्हायला पण तयार आहोत,” असे ठाम मत दीपकआण्णा काटे यांनी मांडले.
या मोर्चामुळे येत्या काही दिवसांत या वादाला आणखी उधाण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.