Home » LATEST NEWS » “घोषणांचा पाऊस… घरांचा दुष्काळ!”

“घोषणांचा पाऊस… घरांचा दुष्काळ!”

 

 गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणार म्हणजे देणारच, असल्या पोकळ बाता मारणाऱ्या सरकारने गिरणी कामगारांची मागणी मुंबई शहरातच घरे मिळाली पाहिजेत अशी असताना देखील पुन्हा एम.एम.आर.डी.ए  म्हणजे मुंबई महानगरप्रदेश नवी मुंबई, उलवे, मीरारोड, अजून कुठे कुठे गाजर दाखवून मुंबईतील गिरणी कामगारांची क्रूर थट्टा केली आहे.

आमदार फोडून  सत्तेवर बसल्यापासून हे सरकार दर काही महिन्याने नवीन घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणे बाबत ‘तारखांवर तारखा’ देण्याचे काम सुरू आहे, असा घणाघाती आरोप संयुक्त मराठी मुंबई चळवळ (कामगार विभाग) कार्याध्यक्ष श्री रमाकांत बने यांनी या संदर्भात भाष्य करताना सरकारवर उपरोधिक टोला लगावला.

केवळ कागदी खेळ मांडला आहे. २०१० साला पासून आजपर्यंत केवळ घोषणांचा पाऊस पाडला, पण प्रत्यक्ष पंधरा हजार कामगारांना घरे देऊन गौरविण्यात आले. म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा, सरकारचा निरुत्साह आणि वेळकाढूपणा करून गिरणीमध्ये घाम गाळून काम करणाऱ्या कामगारांचे  मानसिक शोषण  करून त्यांना मुंबई बहीरील घरे स्विकारण्यास मानसिक हतबल करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत

पोर्टलवर अपात्र कामगार आणि वारस यांना पुरावे सादर करण्याची संधी उपलब्ध करून पारदर्शकतेचा आव आणणारे सरकार, वर्षानुवर्षे खरी माहिती जनतेसमोर आणि कामगारांसमोर मांडण्याचे धाडस का दाखवत नाही? गिरणी कामगार आणि वारस यांचे वयोमर्यादा संपण्याच्या मार्गावर आहेत. कायमस्वरूपी मुंबईत घरे मिळतील या आशेने दिवस ढकलणाऱ्या या कामगारांचे आयुष्य या सरकारच्या धोरणांमुळे उद्ध्वस्त होत आहे. करायला गेले तर यांच्याकडे अफाट गती आणि यंत्रणा आहे, पण मुंबईत गिरणी कामगारांना घरे द्यायचा विषय आला की या ‘बुलेट ट्रेन’ सरकारची गती बैलगाडीपेक्षाही मंद होते. पोर्टल्स आणि घोषणांचे खेळ बंद करा आणि त्वरित कायमस्वरूपी गिरणी कामगारांना घरे मुंबई शहरातच द्या !

ज्या गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना माहिती अभावी सदनिकेसाठी म्हाडाकडे अर्ज करता आले नाहीत अशा कामगार आणि वारसांना एक संधी उपलब्ध करून कशी देता येईल ती पहावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना आमदार प्रसाद लाड यांनी मांडलेल्या प्रस्तावावर माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी दिल्या होत्या. मात्र त्याबाबत प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.संक्रमण शिबिरातील घरे गिरणी कामगारांकरता एक निर्णय घेऊन हे सरकार उपलब्ध करून देऊ शकते फक्त ती इच्छाशक्ती सरकारने दाखवणे गरजेचे आहे. संमती पत्राबाबतीत  अनेक तक्रारी असतानाही त्या संमती पत्राच्या आधारे मुंबईच्या बाहेरील घरांचा डी. पी. आर . देण्याची घाई प्रशासनाने का केली?  एकंदरीत या सर्व प्रकारावर संयुक्त मराठी मुंबई चळवळीकडून जोरदार टीका करण्यात आली असून लवकरच मुंबई शहरातील अधिकारसाठी राज्यव्यापी जनआंदोलनच्या माध्यमातून  हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

2 Comments

  1. बरोबर बोलत आहेत मा. बने साहेब सर्व गिरणी कामगारांची मुंबईतच हक्काचा घर मिळावा मागणी असून सुद्धा आता महामुंबईच्या नावाने बाहेरचा रस्ता दाखवून क्रूर थट्टाच चालवली आहे. गिरणी जर का मुंबईत होत्या सर्व गिरणी कामगारांनी कष्ट करून घाम जर का मुंबईतील गिरण्यामध्येच गाळला होता तर हक्काचा घर पण सर्व गिरणी कामगारांना गिरण्या असलेल्या मुंबई भागातच मिळाला पाहिजे तो सर्व गिरणी कामगारांचा हक्कच आहे. बाहेरील लोंढेच्या लोंढे मुंबईत वाढवायला जागा होते नेहमी मग ज्या मुंबईत ज्या गिरणी कामगारांनी मुंबई उभी केली स्वतःच्या कष्टाने घामाने वेळ प्रसंगी रक्त सांडून त्या गिरणी कामगारांमुळे मुंबईतील लोंढ्यांना जागा होत आहे तर मूळ मुंबई घडवणाऱ्या मुंबईकर गिरणी कामगारांना अजूनपर्यंत जागा का नाही होत आहे. इतरांना जागा करण्याआधी मुंबई घडवणाऱ्या मूळ मुंबईकर गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काच्या घराची जागा करून देऊन कायमस्वरूपी गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्यात यावा आधी मग बाकीच्यांचा विचार करण्यात यावा.
    जय गिरणी कामगार🚩
    सर्व गिरणी कामगार एकजुटीचा विजय असो🚩
    जय शिवराय🚩
    जय महाराष्ट्र 🚩
    मी मुंबईकर🚩🙏👍

  2. हे सरकार गिरणी कामगारांची जाणून बुजून हेळसांड करत आहे.जागा उपलब्ध नसल्याची दाखवून दिशाभूल करत आहे. जर मुंबईत जागा नाही तर जेवढ्या गिरण्या होत्या त्या आकाशात होत्या का?गिरण्यांच्या जमीनीतील
    १/३ हिस्सा हा आम्हा गिरणी कामगारांच्या हक्काचा होता तो कुठे गेला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *