मुंबईतील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या घरांच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘गिरणी कामगार क्रांती सभेत’ मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘क्रांती शपथ’ घेण्याचे आवाहन संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे प्रमुख रमाकांत बने यांनी केले आहे.
रमाकांत बने म्हणाले की, “गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न हा केवळ गृहनिर्माणाचा विषय नाही, तर न्याय, सन्मान आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा लढा निर्णायक टप्प्यावर आला आहे. अशा वेळी प्रत्येक गिरणी कामगार आणि प्रत्येक वारसदाराने एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे.”
ते पुढे म्हणाले की, ९ ऑगस्टच्या क्रांती सभेत उपस्थित राहणारे सर्व गिरणी कामगार आणि वारसदार घरांच्या न्याय्य हक्कासाठी अखेरपर्यंत संघर्ष करण्याची ‘क्रांती शपथ’ घेणार आहेत. ही शपथ केवळ एक औपचारिकता नसून, घरांचा न्याय्य हक्क मिळेपर्यंत संघटितपणे लढण्याचा निर्धार असेल.
या सभेत मुंबईतील गिरणी कामगारांचे मुंबईतच पुनर्वसन, वंचित पात्र गिरणी कामगारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, १९८१ च्या संपातील गिरणी कामगारांचा गृहनिर्माण योजनेत समावेश, संक्रमण शिबिरांतील उपलब्ध घरांचे तातडीने वाटप, तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत विशेष उपाययोजना अशा महत्त्वाच्या मागण्यांवर पुढील संघर्षाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
“क्रांती दिन हा स्वातंत्र्यलढ्यातील त्याग आणि संघर्षाची प्रेरणा देणारा दिवस आहे. त्याच दिवशी आपण आपल्या घरांच्या हक्कासाठी एकजुटीची ‘क्रांती शपथ’ घेऊन सरकारला ठाम संदेश देऊया,” असे आवाहन रमाकांत बने यांनी केले आहे.
९ ऑगस्ट (क्रांती दिन) वेळ : सकाळी १०.०० ते १२.०० स्थळ : आंबेडकर भवन, चित्रा टॉकीजच्या मागे, दादर (पूर्व), मुंबई.
प्रत्येक गिरणी कामगार आणि प्रत्येक वारसदाराची उपस्थिती हा या संघर्षाचा सर्वात मोठा आधार आहे. चला, ९ ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘क्रांती शपथ’ घेऊया आणि घरांच्या न्याय्य हक्कासाठीच्या लढ्याला नवी ताकद देऊया.
संपर्क ९१७५३७८१९९, ९३२२२७६०२२




