
मुंबईसारख्या महानगरात अनेक मोर्चे, आंदोलने आणि सभा होत असतात. पण काही मोर्चे केवळ मागण्यांसाठी नसतात, तर ते असतात न्यायासाठी, हक्कासाठी आणि माणुसकीसाठी. १० मार्च २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर झालेला गिरणी कामगारांचा मोर्चा हाच अशाच लढ्यांपैकी एक होता.
या मोर्च्याची मागणी स्पष्ट होती — गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत आणि वंचित घटकांना न्याय्य संधी मिळाली पाहिजे. या मागणीसाठी हजारो कामगार दूरदूरवरून, विशेषतःसांगली, सातारा, कोल्हापूर ,रत्नागिरी , सिंधुदुर्ग , अशा अनेक भागांतून मुंबईत आले होते. पण या संपूर्ण मोर्च्यामागे एक निःशब्द, निस्वार्थी आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व उभं होतं — रमाकांत बने.
मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून रमाकांत बने यांनी अपार मेहनत घेतली. मोर्च्याच्या दोन दिवस आधीपासून ते मोर्चा झाल्यानंतरही दोन दिवस, त्यांना नीट झोपही मिळाली नाही. तरीही त्यांच्या कामात कुठेही थकवा दिसून आला नाही. १० मार्चच्या दिवशी, सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ते आझाद मैदानावर ठामपणे उभे होते.
जेव्हा अनेक नेते अंधार पडल्यानंतर आपल्या घरी परतले, तेव्हा रमाकांत बने मात्र अजूनही कामात गुंतलेले होते. कोल्हापूरवरून आलेल्या गिरणी कामगारांना सुरक्षितपणे परत पाठवण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. त्यांनी त्या कामगारांना स्वतः स्टेशनवर नेले आणि ट्रेनमध्ये बसवूनच आपली जबाबदारी पूर्ण केली.
या सगळ्या धावपळीत त्यांनी स्वतःच्या जेवणाचीही पर्वा केली नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय होतं — गिरणी कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देणं. अनेक नेते स्टेजवर फक्त श्रेयासाठी उभे होते, पण रमाकांत बने मात्र खऱ्या अर्थाने जमिनीवर उतरून काम करणारे कार्यकर्ते होते.
आजच्या काळात अशा निःस्वार्थी आणि समर्पित कार्यकर्त्यांची गरज अधिक आहे. रमाकांत बने यांच्यासारखे लोकच खऱ्या अर्थाने समाजाचा कणा मजबूत करतात. त्यांची तळमळ, त्याग आणि कामगारांप्रती असलेली निष्ठा ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
हा मोर्चा केवळ एक आंदोलन नव्हता, तर तो होता एका माणसाच्या अथक परिश्रमांचा आणि प्रामाणिक ध्येयाचा जिवंत पुरावा.
सलाम तुमच्या कार्याला रमाकांत बने साहेब……
🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️
लेख : श्रीरंग प्रकाश कदम (सांगली)
गिरणी कामगार वारस
🚩🚩🚩🚩🚩🚩





