मुंबईतील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या घरांचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर पुढील संघर्षाची दिशा निश्चित करण्यासाठी ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी आयोजित करण्यात आलेली ‘गिरणी कामगार क्रांती सभा’ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या सभेत मुंबईतील गिरणी कामगारांचे पुनर्वसन मुंबईतच सन्मानाने व्हावे, गृहनिर्माण योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र गिरणी कामगारांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच ऑक्टोबर १९८१ च्या ऐतिहासिक संपात सहभागी झालेल्या गिरणी कामगारांचा गृहनिर्माण योजनेत समावेश करावा, या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करून पुढील संघर्षाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
याचबरोबर संक्रमण शिबिरांमधील उपलब्ध घरांचे तातडीने वाटप करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा, तसेच मातुल्य मिलसह ज्या गिरण्यांतील कामगारांना सर्व्हिस सर्टिफिकेट उपलब्ध होत नाही, अशा कामगारांना उपलब्ध इतर कागदपत्रे व पुराव्यांच्या आधारे पात्र ठरविण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, या महत्त्वाच्या मागण्याही प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत.
ही सभा केवळ चर्चा किंवा भाषणांपुरती मर्यादित नसून, राज्यव्यापी जनआंदोलनाची पुढील दिशा, सरकारवर प्रभावी लोकदबाव निर्माण करण्याची रणनीती आणि आगामी निर्णायक आंदोलनांची रूपरेषा निश्चित करणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
सभा तपशील
📅 दिनांक : ९ ऑगस्ट (क्रांती दिन) २०२६
🕙 वेळ : सकाळी १०.०० ते १२.००
📍 स्थळ : आंबेडकर भवन, चित्रा टॉकीजच्या मागे, दादर (पूर्व), मुंबई.
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न हा लाखो कुटुंबांच्या भविष्याशी निगडित आहे. त्यामुळे प्रत्येक गिरणी कामगार, प्रत्येक वारसदार आणि या न्याय्य संघर्षाशी बांधिलकी असलेल्या प्रत्येक नागरिकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्काच्या लढ्याला बळ द्यावे.
आजची उपस्थितीच उद्याच्या घराच्या हक्काचा पाया ठरू शकते. चला, ९ ऑगस्ट रोजी एकजुटीची ताकद दाखवूया!
9175378199, 9322276022, 9869281591, 7738591262, 9820260607





One Comment
गिरणी कामगार हक्क मागतोय, भीक नाही.
ज्या गिरणी कामगारांनी आणि मराठी माणसाने घाम गाळून कष्टाने मुंबईला वैभव प्राप्त करून दिले तोच गिरणी कामगार आणि मराठी माणूस मुंबईत उपेक्षित राहिला. मराठी माणसांचा मुंबईतील घटलेला टक्का पुन्हा वाढवायचा असेल तर प्रत्येक गिरणी कामगाराला आणि वारसाला मुंबईतच घर मिळाले पाहिजे.
महानगरपालिका निवडणुकी वेळी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की, मुंबईतून हद्दपार झालेला मराठी माणूस आम्ही पुन्हा मुंबईत आणू. तेव्हा मा. मुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे की मुंबईच्या आसपास नको. गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजे. आता घोषणा पुरे झाल्या. आता कृती करून सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच ५०० चौ.फूट ची मोफत घरे द्यावी. सरकार महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून आलेल्या आणि अनधिकृत झोपडीधारकांना मोफत घरे देते तर ज्या मराठी माणसाने या महाराष्ट्र राज्य घडविण्यासाठी आपल रक्त सांडल. या मुंबई शहराला वैभव प्राप्त करून दिले त्या गिरणी कामगारांना मुंबई बाहेर का फेकले जाते❓❓❓❓❓
त्यामुळे सर्व गिरणी कामगारांची आणि वारसांची एकच मागणी
👉 “मुंबईतच घर द्या!”
👉 “मुंबईच्या बाहेर घर मान्य नाही!”
👉 “आमचा हक्क मुंबईतलाच!”
👉 “ १९८१ च्या पूर्वीच्याही सर्वच गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत
गिरणी कामगार आणि वारस एकजुटीचा विजय असो 👍