इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान करणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला. तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली आहे.
प्रशांत कोरटकर विरोधात नागपूर, कोल्हापूर आणि जालना येथे गुन्हे दाखल होते. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही तो फरार झाला होता. कोल्हापूर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी नागपूर, चंद्रपूर आणि मध्यप्रदेशात शोधमोहीम राबवली. चंद्रपूरमधील एका हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर तो तेलंगणात पळाला. अखेर, कोल्हापूर पोलिसांनी त्याचा मागोवा घेत त्याला अटक केली.
प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवर धमकावले होते. त्याने सावंत यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.