परळ, मुंबई – दिनांक ०३ ऑगस्ट रोजी संयुक्त मराठी मुंबई संघाच्या वतीने परळ येथील मासिक गिरणी कामगार सभा मोठ्या उपस्थितीत पार पडली. या सभेमध्ये चड्डा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडून झालेल्या OTP फसवणुकीबाबत अनेक तक्रारी समोर आल्या. गिरणी कामगारांनी सांगितलेल्या घटनांनुसार, “MHADA”च्या नावाने कॉल करून त्यांच्याकडून OTP मागवून, त्यांच्या संमतीशिवाय वांगणी येथील घरासाठी Consent Form भरले गेले होते.
कामगारांच्या भावनिक आणि कायदेशीर पीडेला गांभीर्याने घेत, संयुक्त मराठी मुंबई संघानेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ चड्डा बिल्डरच्या कार्यालयावर प्रत्यक्ष जाऊन विचारणा केली. या बैठकीत चड्डा बिल्डरच्या व्यवस्थापनासोबत थेट संवाद घडवून, या पुढे अश्या प्रकारची फसवणूक किंवा भ्रम निर्माण करणारे कॉल/संदेश कामगारांना जाणार नाहीत, याची स्पष्ट कबुली घेण्यात आली.
यासोबतच, चड्डा बिल्डर व्यवस्थापनाने असे आश्वासन दिले की – “ज्यांच्या संमतीशिवाय Consent भरले गेले आहेत, अशा कामगारांनी संयुक्त मराठी मुंबई संघाकडे अर्ज दिल्यास,किंवा चड्डा बिल्डरच्या ऑफिसला अर्ज दिल्यास त्यांचे Consent Forms रद्द करण्याची प्रक्रिया MHADA समोर मांडली जाईल.”
संघाच्या वतीने चड्डा बिल्डरला अधिकृत पत्राद्वारे इशारा देण्यात आला आहे की, भविष्यात जर अशा स्वरूपाची फसवणूक पुन्हा घडली, तर कायदेशीर आणि आंदोलनात्मक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया दिली जाईल.
संघाचे कार्याध्यक्ष रमाकांत बने यांनी सांगितले, “गिरणी कामगारांची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. ही लढाई वैयक्तिक नसून सामूहिक हक्काची आहे.”
संयुक्त मराठी मुंबई संघाने पुन्हा एकदा कामगारांना आवाहन केले आहे की – अशा प्रकारच्या फसवणुकीचे शिकार झाले असल्यास तात्काळ संघाशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांचे हक्क वाचवण्यासाठी योग्य ती कारवाई करता येईल.या चर्चेसाठी उपाध्यक्ष- शिवराम जाधव, शाम कबाडी, संपर्क प्रमुख,हरीचंद्र करगळ, सचिव रवींद्र गवळी, खजिनदार प्रवीण कदम, हरेकृष्णा पाटील,राजेंद्र चव्हाण, केरबा कांबळे, रवींद्र साळुंखे, दिलीप खाजनवाडकर, कलपेश राऊत , आश्विन पाटील यांच्यासह वीस ते पंचवीस कार्यकर्ते उपस्थित होते,